किल्लारी भूकंप : ३० सप्टेंबर १९९३ आणि परिसरातील शिक्षण
प्रस्तावना
३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या किल्लारी भूकंपाचा भूकंपकेंद्रापासून सुमारे शंभर किलोमीटरच्या परिघातील शिक्षणव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला. या भूकंपामध्ये अनेक लहान मुले-मुली पूर्णतः अनाथ झाली. कुटुंबीयांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या भावनिक व मानसिक आघाताचा त्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आणि अनेकांची शिक्षणप्रक्रिया खंडित झाली. ज्यांच्यासमोर निवारा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला, त्यांच्यासाठी शिक्षणापेक्षा दैनंदिन जगण्याची गरज अधिक महत्त्वाची ठरली.
मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतरच शिक्षणासारख्या उच्चस्तरीय गरजांकडे लक्ष केंद्रित करता येते. या संदर्भात अब्राहम मास्लो यांच्या ‘गरजांच्या श्रेणीचा सिद्धांत’ प्रासंगिक ठरतो. किल्लारी भूकंपाच्या संदर्भात या सिद्धांताचा विचार केला असता, आपत्तीनंतर प्रभावित लोकसमुदायासमोर अन्न, निवारा, सुरक्षितता आणि उदरनिर्वाह या मूलभूत गरजाच प्राधान्याच्या ठरल्या. परिणामी, शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही मोठ्या प्रमाणात बदलला.
आपत्तीनंतर शिक्षणापेक्षा जगण्याला प्राधान्य
आपत्तीमुळे या भागातील लोकसमुदायासाठी शिक्षण हा आस्थेचा विषय राहण्यापेक्षा जीवन जगण्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरला. ज्या कुटुंबांचा उदरनिर्वाह काही विशिष्ट व्यक्तींवर अवलंबून होता, त्या व्यक्ती अकाली मृत्युमुखी पडल्यामुळे कुटुंबांवर मोठा परिणाम झाला. परिणामी, कुटुंबातील अकमावत्या व्यक्तींसमोर दररोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आणि शिक्षणाकडे दुय्यम गरज म्हणून पाहण्याची परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली.
या परिस्थितीचा परिणाम केवळ विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरच झाला नाही, तर परिसरातील शैक्षणिक संस्थांच्या एकूण वातावरणावरही झाला. भूकंपामुळे अनेक शैक्षणिक केंद्रांची दुरवस्था झाली. तज्ज्ञ व विद्वान शिक्षकांची कमतरता आणि इतर अनुषंगिक कारणांमुळे भूकंपप्रवण परिघातील शैक्षणिक संस्थांमधील पूर्वीचे सौहार्दपूर्ण शैक्षणिक वातावरणही प्रभावित झाले.
आपत्तीच्या एका मोठ्या धक्क्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संबंधांची सलगता खंडित झाली. काही विद्यार्थी आपल्या नातेवाईकांच्या गावी स्थलांतरित झाले. काहींच्या कुटुंबांचे अस्तित्वच बदलले. परिणामी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील ऋणानुबंध अनेकदा केवळ आठवणीपुरते मर्यादित राहिले.
शैक्षणिक पुनर्वसनाचा प्रश्न
या परिसरातील लोकजीवन पूर्वपदावर आणण्याची सर्वांत मोठी जबाबदारी शासनावर होती. त्या अनुषंगाने शासनाने विविध स्तरांवर प्रयत्न केले. मात्र शिक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या घटकाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षणसंस्था, शिक्षणतज्ज्ञ आणि प्रशासकीय यंत्रणेने अपेक्षित व्यापकतेने लक्ष दिले का, हा प्रश्न विचारात घेणे आवश्यक ठरते.
या संदर्भात भारतीय जैन संघटनेचा शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प, बकोरी फाटा, वाघोली, पुणे हा महत्त्वाचा उपक्रम ठरला. या उपक्रमाच्या माध्यमातून काही निवडक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली.
मात्र येथे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो—भूकंपग्रस्त परिसरातील मुलींच्या शिक्षणाच्या संधींचे काय झाले?
मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न
एकविसाव्या शतकात आपण लिंगभेदाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहतो. त्या पार्श्वभूमीवर किल्लारी भूकंपप्रवण परिसरातील मुलींना शिक्षणाच्या कोणत्या नव्या संधी उपलब्ध झाल्या, हा स्वतंत्रपणे विचार करण्याचा विषय आहे.
उपलब्ध परिस्थितीचा विचार करता, मुलींसाठी विशेष आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक संधी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचे दिसून येत नाही. ‘आपलं घर’ या संस्थेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी झालेले प्रयत्न मात्र मोलाचे ठरले.
या परिसरातील अनेक मुलींना स्थानिक शिक्षणसंस्थांमध्येच शिक्षण पूर्ण करावे लागले. त्याच काळात मुलींच्या शिक्षणाबाबत पालकांचा दृष्टिकोन सर्वत्र पुरेसा उदार नव्हता. परिणामी, गुणवंत व प्रज्ञावंत मुलींचा शोध घेणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यांच्यासाठी उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण करणे या बाबींना अपेक्षित गती मिळाली नसावी. त्यामुळे काही प्रज्ञावंत विद्यार्थिनी उदयोन्मुख शैक्षणिक व व्यावसायिक संधींपासून वंचित राहिल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
१९९३ नंतरचे शैक्षणिक बदल
उपलब्ध माहितीनुसार, भारतीय जैन संघटनेच्या शैक्षणिक प्रकल्पाचा अपवाद वगळता या परिसरातील शिक्षणासाठी स्वतंत्र आणि व्यापक स्वरूपाचे विशेष प्रयत्न झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत नाहीत. भूकंपामुळे प्रभावित झालेल्या एकूण ५२ गावांपैकी काही निवडक गावांतील विद्यार्थ्यांना विशेष शैक्षणिक संधी उपलब्ध झाल्या; तर इतर विद्यार्थ्यांना स्थानिक सरकारी व खासगी शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण करावे लागले.
दरम्यान, देशाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीतही मोठे बदल घडत गेले. १९९०च्या दशकात खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण (खाउजा) या प्रक्रियांना गती मिळाली. या बदलांचा शिक्षणक्षेत्रावरही परिणाम झाला.
याच काळात परीक्षांमध्ये सर्वोत्तम गुण मिळविण्यावर भर देणारा ‘लातूर पॅटर्न’ हा गुणवत्तेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणून पुढे आला. या पद्धतीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळाली. मात्र त्याचा प्रभाव प्रामुख्याने लातूर शहराभोवती केंद्रित राहिल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात त्याच प्रमाणात त्याचा विस्तार झाला असता, तर विविध तालुके आणि ग्रामीण भागही या पॅटर्नचे प्रतिनिधी म्हणून पुढे आले असते, असे म्हणण्यास वाव आहे.
शहरीकरण आणि शिक्षणाच्या नव्या संधी
शहरीकरणाच्या वाढत्या प्रक्रियेमुळे लातूर शहर हे शिक्षणाचे आणि लोकसंख्या केंद्रीकरणाचे एक महत्त्वाचे केंद्र बनले. आर्थिक सुधारणांमुळे मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीतही काही प्रमाणात बदल झाला. सुशिक्षित पालकांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी नवे पर्याय शोधण्यास सुरुवात केली.
शहरांमध्ये शिक्षणासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतात, या समजुतीमुळे अनेक पालकांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी शहराकडे वळण्यास सुरुवात केली. काही मध्यमवर्गीय कुटुंबांनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लातूर शहर आणि परिसरात अंशतः किंवा कायमस्वरूपी स्थलांतर केले. यामुळे या परिसरात शिक्षणासंदर्भात नवीन प्रवाह निर्माण झाला आणि शिक्षणाशी संबंधित नव्या जीवनशैलीचा विकास होत गेला.
सध्याची शैक्षणिक परिस्थिती
किल्लारी भूकंपप्रवण परिघातील शिक्षणसंस्थांमध्ये आज कोणत्या प्रकारचे शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
वर्तमान परिस्थितीत उर्वरित महाराष्ट्रातील शिक्षणसंस्थांसमोर ज्या प्रकारची आव्हाने आहेत, त्याच स्वरूपाची अनेक आव्हाने या परिसरातील शाळा, महाविद्यालये आणि विविध पदविका अभ्यासक्रमांसमोरही आहेत. अनुपस्थिती, शिक्षणातील स्थगन, विद्यार्थीगळती आणि औपचारिक शिक्षणाबाबत कमी होत जाणारी प्रेरणा या समस्या त्यात समाविष्ट आहेत.
पूर्वीच्या पिढीला शिक्षणाच्या मर्यादित उपलब्धतेमुळे अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत. आज शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली असली, तरी भविष्यातील शासकीय रोजगाराच्या मर्यादित संधी, रोजगाराच्या बदलत्या स्वरूपाचा परिणाम आणि शासकीय सेवांमधील बदल यामुळे युवक-युवतींच्या मानसिकतेवर परिणाम होताना दिसतो.
परिणामी, काही युवक औपचारिक शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयात नावनोंदणी करणे आणि परीक्षा किंवा प्रात्यक्षिक कार्यासाठी आवश्यक उपस्थिती पूर्ण करणे यापुरते शिक्षण मर्यादित ठेवत असल्याचे वास्तव काही ठिकाणी दिसून येते. वस्तुतः शिक्षक आणि शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत; मात्र त्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळणे हे आजही एक आव्हान आहे.
शासकीय नोकरीविषयीची मानसिकता
२०१० नंतर शासकीय भरतीतील बदल, शासकीय नोकऱ्यांच्या उपलब्धतेतील घट आणि रोजगाराच्या बदलत्या स्वरूपाचा या परिसरातील लोकसमुदायाच्या मानसिकतेवर दूरगामी परिणाम झालेला दिसून येतो.
लोकचर्चांमध्ये अनेकदा, “शिकून आता कुठे नोकऱ्या आहेत?” असा प्रश्न उपस्थित केला जातो. लोकसेवा आयोगाच्या मर्यादित जागा आणि त्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची मोठी संख्या याबाबतची माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे युवकांपर्यंत सहज पोहोचत आहे. त्यामुळे रोजगाराच्या वास्तवाविषयी युवकांमध्ये आत्मपरीक्षणाची प्रक्रिया सुरू झालेली दिसते.
तरीही या परिसरातील लोकसमुदायामध्ये शासकीय नोकरीचे आकर्षण मोठ्या प्रमाणात कायम आहे. त्यामुळे शिक्षण आणि रोजगार यांच्यातील बदलते संबंध समजून घेणे हे शिक्षणसंस्थांसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे.
भौतिक पुनर्वसनापासून शैक्षणिक विकासाकडे
एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात हा परिसर भौतिकदृष्ट्या पूर्ववत होण्याच्या पुढील टप्प्यात प्रवेश करताना दिसतो. पक्की निवासस्थाने उपलब्ध होणे हा पुनर्वसनाचा एक महत्त्वाचा टप्पा होता. त्यानंतर शिक्षण, आरोग्य आणि दळणवळणाच्या प्रभावी संसाधनांची निर्मिती हा विकासाचा पुढील टप्पा ठरला.
शासनाच्या स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील मान्यतेच्या धोरणामुळे या परिसरात खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. त्यामुळे शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या काही शैक्षणिक सुविधा ग्रामीण भागातही उपलब्ध होऊ लागल्या. नव्या आर्थिक संसाधनांवर नियंत्रण असलेल्या आणि नव्या विचारांचा स्वीकार करणाऱ्या कुटुंबांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी या सुविधांचा वापर करण्यास सुरुवात केली.
थोडक्यात, भूकंपप्रवण परिसरही इतर भागांप्रमाणे विकासाच्या प्रक्रियेत पुढे येताना दिसतो.
इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि गुणवत्तेचा प्रश्न
नवीन संस्थांची निर्मिती ही अनेकदा नव्या समस्यांनाही जन्म देते. या परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढली असली, तरी त्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. शिक्षकांची शैक्षणिक अर्हता, विषयज्ञान, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, अध्यापनपद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या संधी यांचा या संदर्भात स्वतंत्रपणे विचार करणे आवश्यक आहे.
इंग्रजी माध्यमाच्या विस्ताराच्या प्रारंभीच्या टप्प्यात शहरी भागांमध्ये इंग्रजीतून प्रभावी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची आवश्यकता निर्माण झाली होती. काही शिक्षणसंस्थांनी त्यासाठी दक्षिणेकडील राज्यांमधून शिक्षकांची नियुक्ती केल्याचे दिसून येते. मात्र अशा स्वरूपाचे व्यापक आणि सर्वंकष प्रयोग या परिसरात मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत नाही.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रभावीपणे आणि प्रवाहीपणे इंग्रजी बोलणाऱ्या शिक्षकांची शैक्षणिक अर्हता, त्यांचे विषयज्ञान आणि अध्यापनाचे माध्यम यांचाही विचार करणे आवश्यक आहे. अनेक सुज्ञ पालकांनी आपल्या पाल्याला इंग्रजी भाषा अवगत व्हावी, या उद्देशाने इंग्रजी माध्यमाच्या शाळांची निवड केली आहे. मात्र केवळ इंग्रजी माध्यमाची निवड म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी नव्हे, हा मुद्दाही महत्त्वाचा आहे.
आपत्ती-जागरूकतेचा अभाव : एक गंभीर उणीव
किल्लारी भूकंपानंतरच्या सुमारे तीन दशकांच्या कालखंडाचा विचार करताना लोकशिक्षणाच्या दृष्टीने एक मोठी उणीव प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे भूकंपप्रवण क्षेत्रात आवश्यक असणारी आपत्ती-जागरूकता आणि सुरक्षिततेची शिस्त याबाबत व्यापक जनजागृतीचा अभाव.
सतत भूकंप होणाऱ्या देशांपैकी एक म्हणून जपानचा उल्लेख केला जातो. तेथे भूकंपरोधक बांधकाम, आपत्तीच्या वेळी घ्यावयाची काळजी आणि आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असणारी शिस्त याबाबत शिक्षणव्यवस्थेच्या माध्यमातून सातत्याने प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे आपत्तीला सामोरे जाण्यासाठी नागरिकांमध्ये स्वयंशिस्त आणि सज्जता निर्माण होते.
किल्लारीसारख्या भूकंपप्रवण परिसरातही अशा प्रकारच्या आपत्ती-जागरूकतेचा शिक्षणव्यवस्थेशी समन्वय साधणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे.
निष्कर्ष
किल्लारी भूकंपाच्या तीन दशकांच्या कालखंडाकडे पाहताना या परिसरातील शिक्षणव्यवस्थेने अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. भूकंपानंतर अन्न, निवारा, सुरक्षितता आणि उदरनिर्वाह या मूलभूत गरजांपासून सुरू झालेला प्रवास आज शैक्षणिक संधींच्या विस्तारापर्यंत पोहोचला आहे. मात्र शिक्षणाकडे केवळ नोकरी मिळविण्याचे किंवा उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाहण्याची मानसिकता बदलणे हे अद्याप एक महत्त्वाचे आव्हान आहे.
शिक्षणाच्या माध्यमातून नव्या संधी निर्माण करण्याची, स्थानिक पातळीवर रोजगार व सेवा निर्माण करण्याची आणि आपत्तीच्या परिस्थितीत सक्षमपणे प्रतिसाद देणारी पिढी घडविण्याचे आव्हान या परिसरातील शिक्षणसंस्थांसमोर आहे.
किल्लारी भूकंपाची स्मृती केवळ एका विनाशकारी आपत्तीची स्मृती म्हणून न राहता, शिक्षण, आपत्ती-जागरूकता, सामाजिक पुनर्बांधणी आणि मानवी विकासासाठी प्रेरणादायी ठरावी, हीच या परिसराच्या भविष्यासाठी महत्त्वाची अपेक्षा आहे.
लेखक :
डॉ. अमोल चव्हाण
सहायोगी प्राध्यापक,
अभिनव एज्युकेशन सोसायटीचे
शिक्षणशास्त्र महाविद्यालय (बी.एड.),
आंबेगाव बु., पुणे – ४६.
Comments
Post a Comment