क : करिअरच्या वाटा
प्रिय विद्यार्थी, मित्र-मैत्रिणींनो दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन !
आज आपण महत्त्वाच्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो दहावी, बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की, आपण कोणत्या विद्याशाखेत प्रवेश घ्यावा किंवा आपण भविष्यात कोणत्या क्षेत्रांमध्ये काम करावे या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण कोण्या एका भविष्यवेत्ते अथवा भविष्यकाराकडे किंवा अन्य व्यक्तींकडे जाण्याची गरज वाटत नाही. याचे कारण म्हणजे आगामी काळामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये काय बदल होणार आहे त्याबद्दल ते एक अंदाज बांधू शकतील मात्र ते अंदाज खरे ठरतील असे नाही पूर्णतः बरोबर असतील असेही नाही, प्रत्येक वेळी प्रत्येक क्षेत्रामध्ये सातत्याने नवनवीन बदल होत आहेत आणि ते बदल हे चिरकालीन तर अजिबातच नाहीत त्यामुळे आपल्याला संभ्रम निर्माण होणे अत्यंत नैसर्गिक व आवश्यक असतात.
विद्यार्थी मित्रांनो एकविसाव्या शतकातील स्पर्धेविषयी आपल्या बरीच माहिती आहे. 'स्पर्धेचे युग' म्हणून आपल्याला त्याची बरीचशी ओळख झालेली आहे. मग या युगामध्ये आपलं करिअर कसं यशस्वी होऊ शकेल ? याबद्दल आपण विचार व चिंतन करणे आवश्यक आहे.खरंतर करिअर म्हणजे फक्त अन् फक्त यशाची चढती कमान फक्त मान-सन्मान अगदी चकचकीत कार्पेट असं काही नसतं ! तर करिअर मध्ये चढ-उतार; खाच-खळगे; अडीअडचणीं; अनुकूल-प्रतिकूल; आवश्यक-अनावश्यक अडथळे असे एकूण सर्वच करियरमध्ये दिसून येते आणि ते असतेही.... पण बऱ्याच करिअर वाॅरिअरची अशी मतं असतात.की यश म्हणजे सर्वस्व ! दहावी-बारावी मध्ये सर्वाधिक गुण म्हणजे सर्वाधिक मोठं जीवनातील यश ! कमी गुण म्हणजे जीवन यशस्वीपणे जगता येत नाही ठीक आहे व्यक्तिगत मत आहेत त्याला तसं व्यक्तिगत मूल्यही आहे,पण हे काय पूर्ण सत्य नाही आणि वैश्विक सत्यही नाही, आपण जे काही करिअर निवडाल त्या करियर मध्ये प्रत्येक व्यक्ती हा एक त्याचा भाग असतो आणि त्यात एक यशस्वी किंवा आदर्श व्यक्ती असते जी सातत्याने परिश्रम घेत असल्याने यशाच्या शिखरावर विराजमान झालेली असते. ही व्यक्ती कोणी एक नसून आपल्या घरातील प्रमुख व्यक्ती असतात. पुरुष वा स्त्री दोहोंपैकी कोणीही.
पहिला टप्पा हा अशा यशस्वी व्यक्तींशी सल्लामसलत, गप्पा, चर्चा करून (आपल्या आईला-वडिलांना,वडिलधारी मंडळी यांना विचारा, मी काय बनावे! कोणते काम करावे, असे तुम्हाला वाटते?)
दुसऱ्या टप्प्यात आपल्यातील असणाऱ्या अंगभूत गुणांचा आणि कुवतीचा विचार करणे आवश्यक आहे.( मी कोणकोणती कामे चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो. माझ्याकडे कोणकोणत्या अंगभूत क्षमता आहेत.)
तिसरा टप्पा जो असतो तो सद्यस्थितीतील करिअरचे मार्ग आणि आगामी काळात निर्माण होणारे करिअरचे नवीन मार्ग याबद्दल चर्चा होणे आवश्यक आहे. मग आपला पाल्य सद्यस्थितीतील असणाऱ्या करिअरच्या मार्गावर वाटचाल करण्यास सक्षम आहे किंवा नाही !याबद्दल ही विचार-विमर्श होणे आवश्यक आहे. आपल्या पाल्याच्या क्षमता या अत्यंत चांगल्या असतील तर आगामी काळातील येणारी सर्व करिअर विषयक सुसंधीचा आणि आव्हानांचा सामना करेल आणि त्यामध्ये तो यशस्वी होईल.असा सकारात्मक पण वेगळा विचार पाल्य आणि पालक या दोघांमध्ये जर विकसित झाला तर करिअरच्या त्रासामुळे आत्महत्या किंवा नैराश्यातून मानसिक रुग्ण तयार होण्यापासून आपण वाचू शकू आणि शाश्वत विकासाच्या मार्गावर विराजमान होऊ शकू.
थोडक्यात करिअर म्हणजे जीवनातील असा एक प्रवास आहे की, ज्यामध्ये विविध स्वभावाचे, विविध रंगाचे, प्रवासी यशाच्या किनाऱ्याच्या शोधात करियर नावाच्या जहाजामध्ये निघालेले असतात, आपण त्यातील एक असा भाव बागळून पुढे गेले की, येणाऱ्या आव्हानावर मात करता येऊ शकते. चला तर मग निघा प्रवासाला सुरू करा पहिल्या टप्प्यापासून.....
डॉ. अमोल शिवाजी चव्हाण...
Comments
Post a Comment