कोरोना व ऑनलाइन शिक्षण आणि बालक, पालकांच्या डोळ्यांचे आरोग्य. डॉ.अमोल शिवाजी चव्हाण
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरक्षात्मक उपाय म्हणून लॉकडाऊन करण्यात आले,
त्या अनुषंगाने शाळा महाविद्यालय, विद्यापीठ यांच्या दैनंदिन व शैक्षणिक कामकाजावर
परिणाम होऊन समग्र शिक्षण व्यवस्थेने आपलं स्वतःचं रुपडं क्षणात बदलून घेतलं,
पाहता- पाहता मोबाईल, कम्प्युटर, टॅब ही इलेक्ट्रॉनिक साधने इंटरनेटच्या जोडणीमुळे
मानवी जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा हिस्सा बनली गेली आणि त्याच्या आधारानेच अवघं जग
आपल्या मुठीत असल्याचा भास लहान-थोरांना झाला, म्हणून की काय, काही वर्ष व
महिन्यांपूर्वी लहान मुलांच्या हातात मोबाईल द्यावा का देऊ नये ? ! की, लहान
मुलांना मोबाईल फोन वापरायला दयावा ! याची चर्चा करणारे पालक अचानक ऑनलाईन शिक्षण व
शिकवणी तास सुरू झाल्याने पालकांनी मुलांना स्वतंत्र फोन घेऊन दिला अन् त्यामुळे
आपसूकच बालवयातील प्रत्येक मूल हे इंटरनेटच्या महाजालात एवढे गुंतूंन गेलं की, या
आभासी जगामध्ये फिरून झाल्यावर त्याला यातून कसं बाहेर काढायचं ? त्याच्या
डोळ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक प्रतिमांच्या शृंखलेत कसे हरवून जातात, अन् खूप
एकाग्रतेने पाहिल्यावर कसं डोळ्यात पाणी येतं ! लहानांपासून मोठ्यांपर्यंत
सर्वांच्या या अतिरिक्त मानसिक गुंतवणुकीमुळे डोळ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आज
प्रत्येक घरामधील चिंतेचा विषय बनला गेलेला आहे.
स्थळ : २१ व्या शतकातील मध्यमवर्गीय कुटुंब ! ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य हे सुशिक्षित आणि सुसंस्कारी
व बदलाला स्वीकारणारे आहेत, अशा या परिवारातील प्रमुख सदस्य आणि त्याच्या मुलाने
कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवीन बदलाला अनुसरून घेतलेली भूमिका
कशी नवीन प्रश्न निर्माण करते व काळजी वाढविते याचा ऊहापोह पुढील लेखात करण्यात
आलेला आहे.
प्रसंग एक: आज ज्ञानेशचा पहिला ऑनलाईन तास होता त्यामुळे घरातील एकूणच
सगळेजण खूप टेन्शनमध्ये होते, कारणही तसंच होतं कारण या घरात हा ऑनलाईनचा पहिलाच
तास होता एक तास अगोदर शाळेतून ज्ञानेशच्या पप्पाच्या फोनवरती ऑनलाइन तासाची लिंक
प्राप्त झाली आणि त्यांनी त्यावर क्लिक करून ऑनलाइन क्लासला जोडले जाण्याची
पूर्वतयारी करून घेतली जसा- जसा वेळ जवळ येत गेला तशी-तशी सर्वांची उत्सुकता शिगेला
पोहोचली आणि ज्ञानेश एका क्लिकवर शाळेतील शिक्षकांच्या क्लासला जोडला गेला. दोन-तीन
मिनिटे सर्वांची वाट पाहून शिक्षकांनी वर्गाला सुरुवात केली. सुप्रभात !मुलांनो,
असा आवाज दिला पण एकाच मुलीने त्यांना प्रतिसाद दिला. बाकीची मुलं गप्प !
शिक्षकांनी या ऑनलाइन क्लासमध्ये सर्वांनी नमस्कार केलं तर कशी मजा येते ते हे
सांगितलं तशी मुलं हळूहळू नमस्कार सर !नमस्कार ! असं म्हणू लागली पाहता पाहता पाठ
सुरू झाला आणि मुलं-मुली त्यामध्ये समरस होऊन गेली, ऐकू लागली शिक्षक मध्ये-मध्ये
प्रश्न विचारु लागले, प्रश्न- उत्तर, स्पष्टीकरण, आशयाचे सादरीकरण, यात एक-एक ओळ
करत पाठ पूर्णत्वाकडे जाऊ लागला तसं- तसं एकाच जाग्यावर एकाच ठिकाणी, मोबाईलच्या
स्क्रीनकडे खूपच एकाग्रतेने पाहिल्यामुळे ज्ञानेशच्या डोळ्यांमधून एकाएकी पाणी येऊ
लागले हे त्याच्या आजोबांनी पाहिले आणि त्याला स्क्रीन समोरून थोडेसे दूर व्हायला
सांगितले परंतु ज्ञानेशला असं वाटले की टीचर त्याला रागावतील, म्हणून तो आजोबांना
"टीचर रागवतील" असं सांगू लागला,आजोबाही त्याचं ऐकून थांबले, त्याच्या बाबांनी
त्याला मोबाईलचा व्हिडिओ बंद आहे त्यामुळे जर तू थोडासा दूर झालास तरी टीचर तुला
रागावणार नाहीत, कारण त्यांना (टीचरला) तू दिसत नाहीस असे सांगितल्यानंतर तो दूर
झाला आणि डोळे चोळू लागला असं ऑनलाईन शिक्षण एक, दोन नव्हे तर सातत्याने आठ- नऊ
महिने चाललं आणि मुला-मुलींचे पालक आपसूकपणे डोळ्यांच्या दवाखान्यामध्ये दिसू
लागली, डोळाला एकाएकी येणाऱ्या पाण्याची समस्या डॉक्टरांना सांगून झाल्यावर
डॉक्टरांनी ज्ञानेशला मायनस नंबरचा चष्मा लावण्याचा सल्ला दिला व सतत, एकटक मोबाईल
न पाहण्याचा सल्ला दिला आणि त्यातून त्याच्या डोळ्याच्या आरोग्याचा प्रश्न काहीसा
निराकरणाच्या जवळ येऊन पोहोचला. ऑनलाईन शिक्षणाच्या अत्यंत तंतोतंत पालनामुळे व
कोरोनाच्या संकटातून वाचण्यासाठी ज्ञानेशचे मैदानावरील खेळणे कमी झाले व शारीरिक
हालचाल कमी झाल्याने ज्ञानेशच्या शारीरिक सुदृढतेवरही त्याचा परिणाम झाला त्यातून
त्याला मरगळ आली आणि मैदानावर खेळण्यापासून तो काही दिवसांसाठी वंचित राहिला,
सर्वकाही असतानाही ज्ञानेशच्या डोळ्याचा आरोग्य निर्देशांक व शारीरिक सुदृढता
निर्देशांक आज कितीतरी खाली आला हे पाहून पालकांना व संबंध कुटुंबियांना खूपच वाईट
वाटले, असे कितीतरी ज्ञानेश आज काॅन्क्रिटच्या जंगलात अडकून पडलेले पहावयास मिळतात
प्रसंग दोन : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जगात इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या गुगल
या कंपनीने डिसेंबर 2021 पर्यंत "वर्क फ्रॉम होम" या धोरणाचा स्वीकार केल्याने
ज्ञानेशच्या बाबांना घरून काम करण्याची संधी प्राप्त झाली. त्यांच्याकडे स्वतःचा
लॅपटॉप होताच पण कंपनीने एक महत्त्वाची आवश्यक वस्तू म्हणून त्यांना लॅपटॉप आणि
तत्सम लागणाऱ्या वस्तू पुरविल्या कंपनीचे मुख्यालय अमेरिकेत असल्याने तिथल्या
कामाच्या वेळा याप्रमाणे ज्ञानेश च्या वडिलांना घरातूनच काम करावेसे लागले तिकडे
रात्र, इकडे दिवस आणि तिकडे दिवस, इकडे रात्र या एकूण चक्रामुळे त्यांची दिनचर्या
पूर्णतः बदलून गेली. "वर्क फ्रॉम होम" यामुळे कामात थोडीशीही कुचराई चालत नव्हती
अत्यंत तंतोतंतपणा त्यांच्या वाट्याला आला. घरांमध्ये असून सुद्धा घरांमध्ये
नसल्याचा त्यांना भास होऊ लागला सातत्याने येणारे ई-मेल्स, फोन कॉल्स आणि तातडीचे
रिपोर्टिंग यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याबरोबरच लॅपटॉप आणि मोबाइलच्या अत्याधिक
वापरामुळे सर्वच शारीरिक यंत्रणेवर ताण येऊ लागला, त्यांनाही त्यांच्या बाबांनी
फॅमिली डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला.
https://www.nei.nih.gov/learn-about-eye-health/nei-for-kids/healthy-vision-tips
डॉक्टरांनीही त्यांना त्यांच्या दिनेश दिनचर्येबद्दल आवश्यक तेवढे प्रश्न विचारले, एकूणच त्यांना समस्येचे मूळ कळताच
डॉक्टरांनी त्यांना इलेक्ट्रॉनिक डिवाइसच्या अतिरिक्त वापरापासून स्वतःला
वाचविण्याचा सल्ला देऊन डोळ्यामध्ये औषधाचे ड्रॉप्स टाकण्यास सांगितले काही अन्य
साधारण तोडग्यांचाही वापर करण्याचा सल्ला देऊन पुढील तारीख देऊन तो प्रश्न काहीसा
निकाली काढण्याचा प्रयत्न डॉक्टरांकडून झाला. वरील दोन्ही प्रसंगाकडे पाहता असे
वाटते की, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी मानवी यंत्रणेने
संरक्षणात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊन केले, एक समस्या सोडविण्यासाठी एक उपाय केला
त्यातून दुसरी समस्या निर्माण झाली ज्या घटकाच्या सुरक्षितेसाठी एवढ्या
उपाययोजनांची अंमलबजावणी झाली मात्र नागरिकांचे जीवन हे समस्येने एवढे ग्रासले आहे
की, यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग म्हणजे "न्यू नार्मल लाईफ" च्या
अंगिकाराबरोबरच, भौतिक जीवनाच्या अधीन न जाता, महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे
कमीत- कमी गरजा ठेऊन आणि जीवन व्यतीत करत असताना कसल्याही प्रकारची शारीरिक हानी
पोहचू नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे ज्यामुळे निरोगी आणि निरामय जीवन जगता
येईल, अन्यथा आपणही कुपोषणग्रस्त होणार हे निश्चित! जरी पैशाने सुख मिळत असेलही पण
आरोग्य नाही,जरी आपण कितीही मायनस नंबरचा, आणि तितकाच फॅन्सी चष्मा वापरला तरीही
आपला नंबर कमी होईल या कल्पनेत रममाण न होता काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा चष्मा
वापरला जाणे आणि इलेक्ट्रिक संसाधनांचा अतिरिक्त वापर करणे हे अपायकारक असून लवकर
डोळयांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या समस्येत कायमचे अडकून पडण्याचा धोका संभवू शकतो .
Comments
Post a Comment