सामाजिक परिपक्वतेसाठी हवे प्रभावी संप्रेषण .
सामाजिक परिपक्वतेसाठी हवे प्रभावी संप्रेषण
अशी जाहिरात आपण आज शहरात आणि निमशहरी व ग्रामीण भागात सर्रास पाहतो. आणखी काही वर्षांनी यात काही वेगळे बदल झाले तरीही फारसे आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नसेल. कारण आजकाल बाहेरच्या संपूर्ण जगाशी आभासी दुनियेत जोडले जाण्याच्या आणि सतत अद्ययावत राहण्याच्या नादात प्रत्यक्ष समोर असलेल्या दोन व्यक्तींमधील संवाद मात्र विसंवादात रूपांतरित होत चालला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या आपत्तीनंतरच्या काळात तर ही दरी आणखीनच वाढत चाललेली आहे.
कधीही कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये एखादे कुटुंब जेवण्यासाठी आले आणि त्यांचे निरीक्षण केले तर हे हमखास दिसते की, कुटुंबातील सर्वजण आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. जेवण सुरू करण्यापूर्वी पहिले काम केले जाते ते म्हणजे फोटो काढून सोशल मीडियावर टाकणे. आभासी दुनियेत जोडून राहण्याच्या नादात समोर बसलेल्या कुटुंबियांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचे, आपल्या भाव-भावना समोरासमोर व्यक्त करण्याचे मात्र राहूनच जाते. कारण आपण आपले सुख, आपला आनंद सोशल मीडियावर शेअर करू शकतो. असा मृगजळासारखा भास मन जपत असते मात्र दुःख व त्रास वाटून घेण्यासाठी मात्र कोणीतरी आपल्या जवळचे आपल्याशी बोलण्यासाठी हवे असते.
आपण कोणत्याही ठिकाणी बाहेर जात असताना कोठे जात आहोत याचा विचार करून कपड्यांची निवड करत असतो. एखाद्या लग्न समारंभासाठी जाताना वेगळे कपडे परिधान करू. ऑफिसला किंवा कामावर जात असताना वेगळे कपडे परिधान करू. बाहेर फिरायला जाताना, सिनेमाला, नाटकाला जाताना वेगळे कपडे परिधान करू. अंत्यविधीला जात असताना वेगळ्या कपड्यांची निवड केलेली असते. जसे आपण पोशाखाच्या बाबतीत प्रसंगानुरूप चोखंदळ असतो. तसेच प्रसंगाानुरूप संवादाच्या बाबतीत काळजी घेतो का?
स्वतःच्या विचारांची शाब्दिक किंवा अशाब्दिक पद्धतीने प्रभावी अभिव्यक्ती करता येणे म्हणजेच परिणामकारक संप्रेषण होय. दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये केवळ संदेशाचे आदान-प्रदान म्हणजे संप्रेषण नव्हे तर इतरांची मते समजून घेणे. इतरांच्या मतांचा आदर करणे. इतरांच्या मतांचा स्वीकार करणे. सुसंगतपणे बोलता येणे. कालसापेक्ष किंवा समयसूचकता बाळगून आपले मत व्यक्त करणे. काही विशिष्ट हेतूने दुसऱ्याशी संवाद साधणे आणि त्यातून संबंधित व्यक्तींमध्ये अपेक्षित वर्तन बदल घडणे हा संवादाचा मूळ हेतू असतो. संभाषण हे स्पष्ट, संक्षिप्त, योग्य, सुसंगत, पूर्ण आणि विनम्र असायला हवे. संभाषण कौशल्यांमध्ये बोलणे, लिहिणे, हाव-भाव, देहबोली किंवा संकेतातून माहिती देणे यांचा समावेश होतो.
आजकालच्या धावपळ व स्पर्धेच्या युगात परस्परातील संवाद योग्य रीतीने न घडल्यामुळेच किंबहुना आपल्या भावना समोरच्या व्यक्तीचा आदर करून योग्य रीतीने व्यक्त न करता आल्यामुळेच कुटुंबातील कलह, समाजातील विसंवाद वाढत चाललेला आहे. आणि म्हणूनच प्रभावी संप्रेषणासाठी परिपक्वता (मागील ब्लॉग मध्ये आपण परिपक्वतेच्या बाबतीत माहिती घेतली आहे) आणि परिवार, समाज यातील संवाद सुकर होण्यासाठी पर्यायाने सामाजिक परिपक्वता हा घटक अतिशय महत्त्वाचा ठरतो.
आता येथे परिपक्वतेचा विचार सामाजिक वातावरणात करणे म्हणजेच सामाजिक परिपक्वता होय. सामाजिक परिपक्वता म्हणजेच समोरच्या व्यक्तीचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घेऊन त्यास योग्य तो शाब्दिक किंवा अशाब्दिक प्रतिसाद देणे. आपले मत, विचार समोरच्या व्यक्तीच्या भावना न दुखावता मांडणे. आपल्या भावना, विचार योग्य त्यावेळी योग्य त्या व्यक्तीसमोर मांडता येणे. समाज माध्यमावर आलेल्या आलेख, व्हिडीओ, आँडिओ पोस्टच्या बाबतीत प्रतिक्रिया देताना स्वतःच्या सदसद्विवेक बुद्धीचा वापर करून योग्य तो प्रतिसाद देणे. या सर्व गोष्टींची काळजी संभाषण करताना घेतली तर दोन व्यक्तींमध्ये, व्यक्तितंर्गत आणि विविध समाजामध्ये संवाद वाढीस लागून सामाजिक स्वास्थ्य टिकेल. म्हणूनच संवादातील सातत्य वाढीस लागून सामाजिक स्थैर्य नांदण्यास आणि निरोगी समाज घडण्यासाठी सामाजिक परिपक्वतेची निकड भासते.
कारण संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटलेले आहेच की,
बोलावे बरे| बोलावे खरे|
कोणाच्याही मनावर| पाडू नये चरे|
शब्दांमुळे दंगल| शब्दांमुळे मंगल|
शब्दांचे हे जंगल| जागृत रहावं|
जिभेवरी ताबा| सर्व सुखदाता|
Comments
Post a Comment