सोशल मिडिया वापरताना हवी परिपक्वतेची जोड….

 सोशल मिडिया वापरताना हवी परिपक्वतेची जोड…. 



         सोशल मीडिया…… सर्वांच्याच अतिपरिचयाची बाब.... सर्वांनाच आपले म्हणणे मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ..... आपल्या जीवनात घडणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्याचे ठिकाण..... आणि इतरांच्या आयुष्यात डोकावण्याची संधी....

        आजकाल सोशल मीडियावरून कुणाची तरी फसवणूक झाली किंवा कुणाला तरी लुबाडले अशा बातम्या बऱ्याचदा आपण बघतो किंवा वाचतो. सोशल मीडियावरून फसवणुकीच्या वेगवेगळ्या नवनवीन पद्धती आपणास पाहायला मिळतात. त्यातलीच एक बऱ्याचदा वाचायला मिळणारी बातमी म्हणजे सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून एखादी व्यक्ती आपण परदेशात स्थायिक असून उच्च शिक्षित असल्याचा आव आणून परदेशात नामांकित कंपनीत मोठ्या पगारावर काम करत आहे वगैरे थापा मारते. त्यात स्वतःचे खोटे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले असतात. असे संभाषण वाढत नेऊन थोडाफार विश्वास संपादन केला जातो आणि नंतर आपण एखादी महागडी भेटवस्तू म्हणून पाठवत आहे असे सांगितले जाते. काही दिवसांनी अचानक विमानतळावरील कस्टम अधिकारी बोलत असल्याचे सांगून फोन येतो आणि त्यात महागडी वस्तू आपल्या नावावर आली असल्याचे सांगून ती  मिळवण्यासाठी काही ठराविक रक्कम एखाद्या बँक खात्यावर भरण्यास सांगितली जाते. हे आणखी खरे वाटावे म्हणून त्याच भेटवस्तूचा फोटो पाठवला जातो. आणखी काही दिवसांनी परत काही रक्कम भरण्यास सांगितले जाते परंतु हाती काहीच लागत नाही. तेव्हा आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येते परंतु तोपर्यंत फार उशीर झालेला असतो.

          तसेच फसवणुकीचा आणखी एक प्रकार म्हणजे अचानक सोशल मीडियावर एखादा संदेश येतो  की सोशल मीडियातील जाहिराती तसेच माहितीस लाईक केल्यास चांगला मोबदला मिळेल. हे सर्व काम घरात बसून, फावल्या वेळेत मोबाईल वर सुद्धा करता येणे शक्य आहे. सुरुवातीला काम केल्यानंतर चांगला मोबदला देखील मिळतो. परंतु नंतर त्यात काही पैसे गुंतवल्यास आणखी चांगला परतावा मिळेल असे अमिष दाखवले जाते. एखाद्यावेळी असा चांगला परतावा देखील मिळतो. परंतु नंतर आणखी पैसे गुंतवल्यानंतर मात्र काही संपर्क होत नाही आणि सर्वच पैसे बुडाल्याचे लक्षात येते आणि हे सर्व  कृत्य करण्यासाठी संबंधित व्यक्तीचे फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी वरची माहिती हे हेर काढतात. त्याचा नीट मागोवा घेतात, अभ्यास करतात. आणि संबंधित व्यक्तीच्या आवडीनिवडीच्या आधारावर विश्वास संपादन करतात आणि बहुतेकदा हे सर्व करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या अगदी दूरवरचे ठिकाणी निवडलेले असते. त्यासाठी आपल्याला सोशल मीडियाच्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्याअगोदर त्या माहितीची शहानिशा करणे अतिशय आवश्यक असते. शहानिशा हा प्राप्त माहिती खात्री करून घेण्याची एक प्रक्रिया आहे. तसे तर प्राप्त संदेश, माहिती, प्रदत्त(Data) हा प्राथमिक स्वरूपात स्वीकारला गेल्यानंतर त्यावर प्रक्रिया म्हणून शहानिशा, खातरजमा, ह्या गोष्टी करण्यासाठी एक पक्वता लागते जी की, आपणा सर्वांना परिपक्वता हा शब्द ज्ञात आहेच. 

   जसे की, लौकिक अर्थाने परिपक्व फळाचे ज्याप्रमाणे गुणधर्म बदललेले असतात, चव गोड असते, रंग बदललेला असतो आणि अंगी मऊपणा असतो. त्याप्रमाणेच परिपक्व व्यक्तीच्या बोलण्यात देखील गोडवा असतो. देहबोलीत आत्मविश्वास असतो आणि अंगी नम्रता असते. परंतु व्यक्तिगतरीत्या परिपक्व असणारी व्यक्ती ही जीवनाच्या सर्वच पैलूंमध्ये परिपक्व असेलच असे नाही. उदाहरणार्थ:-  एखादी व्यक्ती व्यक्ती-व्यक्तितंर्गत  संबंधात फारच परिपूर्ण व पक्व असेल पण ती व्यक्ती राजकीय व सामाजिक पैलूंबाबत परिपक्व असेल असे नाही ! 

समजा, एखादी व्यक्ती ही व्यापक  समाज हिताचा विचार करून वागते. सामाजिक मूल्य-परंपरा जपते. सामाजिक सलोखा टिकून ठेवण्यासाठी सामंजस्याने संतुलितपणे वागते. सहकार्यांशी सौहार्दपूर्ण  संबंध ठेवते. इतरांचा आदर करते. सामाजिक सहिष्णुता बाळगते. सामाजिक बांधिलकी जपते, अशा व्यक्तीस वा व्यक्तीमत्वास सामाजिकदृष्टया परिपक्व व्यक्ती असे संबोधित करणे संयुक्तिक ठरेल. 

            आज समाजात काही उच्च पदावर काम करणारे लोक किंवा उच्चशिक्षित व्यक्ती देखील सामाजिक परिपक्वतेची विशिष्ट वा अपेक्षित पातळी गाठलेली नाही असे त्यांनी केलेले  सामाजिक प्रसंगावरील भाष्याचे विश्लेषण केले की निदर्शनास येते. 

     वर्तमान काळात  आज समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक यांवर आक्षेपार्ह विधाने केली जातात आणि त्याचे व्हिडिओ फार वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडिया हाताळताना सामाजिक  अपरिपक्व व्यक्ती त्यावर ज्या पद्धतीने कमेंट्स करतात, टोकाची विधाने करतात. तेव्हा अशा सामाजिक अपरिपक्व व्यक्तीमुळे समाजातील स्थैर्य, शांतता भंग पावून संपूर्ण समाजाचे मानसिक व पर्यायाने सामाजिक स्वास्थ्य हे अतिदक्षता विभागात (ICU)  दाखल झाल्याचे  आपल्याला पहायला मिळते. 

            हल्ली अगदी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण वापरण्यास अतिशय सुलभ असल्याने व्हाॅट्सअप मोठ्या प्रमाणात वापरत असतात. त्यात फॉरवर्डेड मेसेज चे प्रमाण फार मोठे असते. आलेल्या माहितीवर कोणताही विचार न करता आलेला मेसेज पुढे पाठवत राहणे हेच अनेकांचे काम असते. आलेल्या माहितीत कितपत तत्थ्य आहे, ती माहिती कोणत्या स्रोतांच्या आधारावर लिहिलेली आहे, (प्रत्यक्ष पाहिलेल्या व्यक्तीने {प्राथमिक स्रोत} की ऐकीव माहितीच्या आधारे {दुय्यम स्रोत}  त्याचा वाचणाऱ्याच्या मनावर कोणता परिणाम होईल ?   याचा कोणताही विचार यात केलेला नसावा आणि मग अविवेकी, अहितकारक अपरिपक्व व्यक्ती कोणताही विचार न करता त्यावर आक्षेपार्ह कमेंट्स करतात आणि कधी-कधी त्याही पुढे जाऊन समाज विघातक कृत्यांमध्ये सहभागी होतात.  

             भारतात दररोज प्रत्येक व्यक्ती सर्वसाधारणपणे सरासरी दोन तासांपेक्षा अधिक वेळ सोशल मीडिया वापरण्यात घालवते असे आढळून आले आहे आणि यात नवीन पिढीसोबतच जुन्या पिढ्याही मागे नाहीत. हातातील स्मार्टफोन बोलण्यापेक्षा बघण्यात सर्वाधिक वेळ घालवला जातो आणि हे बघता बघता अनेक जण काही गैरप्रकारांना सामोरे जातात.

             हा सगळा विस्कळीतपणा आणि अशा घटनांचे प्रमाण एकदम कमी करण्यासाठी, किंबहुना संपूर्णतः थांबवण्यासाठी शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये सारासार विवेक वा परिपक्वतेचे विचार रुजवणे अतिशय आवश्यक आहे. कारण संत तुकाराम महाराजांनी  आपल्या अभंगात म्हटलेले आहेच की,

 "धन्य तोचि प्राणी  क्षमा ज्याचे अंगी, न भंगे प्रसंगी धैर्यशील,

 न म्हणे कोणाशी उत्तम वाईट, महत्त्व वरिष्ठ नसे जेथे"


Comments

Popular Posts